Monday, March 30, 2020

महाराजांचा शिवराज्याभिषेक

आज ज्येष्ठ मास शुक्ल त्रयोदशी.. आजच्या दिवशी महाराज छत्रपती झाले.. गोर-गरीबांसाठी, बाल स्त्रियांसाठी जुलमी अत्याचार करणाऱ्या यावनांपासून रक्षण करणारे कैवारी झाले, रक्षण करणारे छत्र झाले.. कसा असेल ना तो दिवस....
 'अजि सोनियाचा दिनु वर्षे अमृताचा घनु' असंच काहीतरी तो बलाढ्य श्री रायगड अनुभवत असेल ना.. आनंदाच्या दोही आनंद तरंग असंच त्या निळ्याभोर नभापरी उमटलं असेल ना... प्रत्येक बुरुज, तटबंदी, महाद्वार, चोरवाट, गडाच्या भिंतींनी झेललेले टोफ्यांचे मार, शस्त्रास्त्रांचे वार, ती जखम आज भरून निघाली असेल ना....
ह्या दिवसाची वाट जणू प्रत्येकाने पाहिली असणार....

महाराजांचा राज्याभिषेक दोन टप्प्यात पार पडला आधी घरातल्या नातलग व मंत्रिमंडळां समवेत गडाचा आतल्या दालनात अभिषेक झाला आणि मग प्रजेदेखत सिंहासनारोहण.....
 'पंचामृतंस्नानं समर्पयामि।'असे म्हणताना दूध, दही, मधु, घृत, शर्करा हे पाच अमृत पण त्यांचे गुण विसरून राजांच्या कोमलतेत, सद्गुणात, सामर्थ्यात, स्नेहभावात आणि मधुरतेत विलीन झाले असतील ना...
 "गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती
 नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधिं कुरु।।”
हे म्हणताना महाराजांच्या मस्तकावरून जेव्हा सप्तनद्या घळघळले असणार तेव्हा गोदावरीला ह्या पावन भूमीत जन्मल्याचा आनंद हेवा वाटला असणारच पण इतर नद्यांना जुलमी मुघल साम्राज्यापासून काही काळ वाचून महाराजांच्या मस्तकावरून वाहताना, अंगाखांद्यावर बागडताना, पायाशी नतमस्तक होताना किती तृप्त वाटलं असेल ना अगदी माहेरात आल्यासारखं, गगनात आनंद मावेनासा.....
 मंत्र तंत्र यंत्र युक्त असा अभिषेक सोहळा पार पाडून वस्त्रे अलंकार धारण करून, देवघरात कुलदेवतेला नमस्कार करून आई जिजाऊंचा आशीर्वाद घेऊन सिंहासनारोहण विधीसाठी महाराज राज्यसभेकडे जायला निघाले..

 महाराज सिंहासनारोहण होण्यासाठी सज्ज.. महाराज पूर्वेकडे तोंड करून उभे आहेत..... हळूहळू सूर्यही त्याच्या छटा पसरवत होता पण त्याने त्याचे तेज आज महाराजांना दिले होते... अशावेळी कट्यार काळजात घुसली ह्यात शंकर महादेवन यांनी गायलेलं एक गाणं आठवतं....
" तेजोनिधी लोहगोल, भास्कर हे गगनराज
दिव्य तुझ्या तेजाने झगमगले भुवन आज
हे दिनमणी व्योमराज, भास्कर हे गगनराज।।

कोटी कोटी किरण तुझे अनलशरा उधळिती
अमृतकण परि होऊन अणुरेणु उजळिती
तेजातच जनन-मरण, तेजातच नवीन साज
हे दिनमणी व्योमराज"

महाराजांचे हे चित्र डोळ्यासमोर आणा.. त्या तेजापुढे आपले हातही जोडले जात आहेत.. नकळत नतमस्तक होणारे आपण आणि डोळ्यातुन ओघळणारे अश्रू........

महाराज पूर्वेकडे तोंड करून उभे आहेत..  समोर दूरवर दोन लेकरांचे, गडांचे कळस दिसत आहेत- श्री राजगड व श्री तोरणा...त्यांना पाहून महाराजांच्या डोळ्यासमोर संपूर्ण इतिहास उभा ठाकला असावा... मूठभर मावळ्यांसमवेत हिंदवी स्वराज्याची घेतलेली शपथ ते आता बलाढय साम्राज्य, आग्र्याला झालेला अवमान, अवघ्या नऊ वर्षाच्या शंभू बरोबर मृत्यूपासून सर्व  मावळ्यांसोबत केलेली सुटका, पुरंदर तह, उंचपुऱ्या बलदंड अफजलखानाचा वध, पन्हाळगडाचा वेढा, खडा पहारा असताना जोखमीचे काम हातात घेऊन स्वतः लाल महालात शिरणे, सर्व इतिहास त्या लेकरांकडे बघून महाराजांच्या डोळ्यांसमोरून सरकत असेल ना...
अशावेळी महाराजांना स्वराज्य संकल्पक आबासाहेब शाहाजी महाराजांची, संभा दादाची, तानाजीची, बाजी प्रभूंची किती आठवण आली असेल ना..
महाराणी सईबाई जेव्हा शेवटच्या घटका मोजत होत्या तेव्हा त्यांनी महाराजांना शंभू बरोबर तिच्या दुसऱ्या लेकराचं ही रक्षण करायचं, बापाबरोबर आईचं प्रेम,जिव्हाळा देण्याचं वचन मागितलं होतं,
आज तो दुसरा लेक म्हणजे हे हिंदवी स्वराज्य त्याचं छत्रपती होताना महाराजांना महाराणी सईबाईंच्या वचनाचं सार्थक केल्यासारखं वाटत असेल ना..
मृत्यूपासून अनेक वेळा परतलेले महाराज आज छत्रपती होत आहेत, अंगावर शहारे उभारत आहे.. यमराज ही चित्रगुप्ताला आसवे लपवून अभिमानाने सांगत असेल मी हा तेजापुढे झुकलो...
 मृत्यू पासून रक्षण त्या जिजाऊ माऊलींमुळेच, त्यांच्या संस्कारांमुळेच झाले..

"विद्यागुरुहुनि थोर आदर्श मातेचे उपकार।
गर्भापासोनि तिचे संस्कार बालकांवरि।।"
त्या माऊलीला आज तिचे जीवन सार्थक झाले असेल असंच वाटत असेल ना, त्या माऊलीचा ऊर भरून आला असेल ना...
'याजसाठीं केला होता अट्टहास।' असे तिला वाटत असेल ना....
ह्या क्षणी महाराजांच्या मनात हा श्लोक घोळत असेल..
आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरम्।
सर्वदेवनमस्कार: मातरं प्रति गच्छति ||

हे सर्व महाराजांच्या मनात चालू असेल पण त्यांना अश्रू लपवावे लागत होते कारण ते आता छत्रपती होते..
काही थेंब अश्रू ओघळत होते पण एका हातात सोन्याची विष्णूची मूर्ती व दुसऱ्या हातात धनुष्य असताना आसवे पुसता येत नव्हते, अशावेळी ना जिजाऊ माऊलींच्या कुशीत शिरून घडाघडा रडता येत होते.... नकळत काही अश्रू त्या सिंहासनाच्या पायऱ्यांवर पडले, तृप्त झाले..

विचारांचा थैमान थांबवला गागाभट्टांच्या शब्दांनी- "महाराज सिंहासनावर आरुढ व्हा"।।
आणि महाराज सिंहासनावर आरुढ झाले, एकच जयघोष झाला.........
"क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधिश्वर छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय.....
पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणणारी ही रायगड नगरी, ह्या जयजयकाराने दुमदुमली असणार.. सह्याद्रीचे कडेपठार, गडकोट किल्ले नतमस्तक झाले असणार, वारा सुगंधी मंद वाहत असणार, झाडं पानं फुलं डुलत असणार
वाद्य, तोफांचा निनाद घुमघुमत असणार.. भगवे झेंडे ह्या जयघोषाने उंच उंच फडकले असणार.. बाजूला विसावा घेणारी जगदंबा तलवार ह्या आपल्या जाणता राजाच्या छत्रपतींच्या पावन हातात यवनांचा खातमा करण्यासाठी अजून हिरहिरीने सज्ज झाली असणार..
अखेर हा स्वराज्य संस्थापक छत्रपती झाला.. हत्तीवर आरुढ होऊन मिरवणूक निघाली, जगदीश्वराच्या दर्शनाला, शिवाची भेट शिवाला.. फुले, अक्षता, चुरमुरे, बिल्वपत्र, तुळशीपत्र, लाह्या, बत्ताशे साऱ्यांची मंगलवृष्टी होत होती.. मिरवणूक निघाली....
रामराज्य स्थापिले, संपूर्ण रायगड भूमी दिवळीसम झगमगत होती कारण महाराज छत्रपती झाले..
"तेज तम अंस पर, कान्ह जिमि कंस पर, त्यौं मलिच्छ बंस पर, सेर शिवराज हैं॥"
छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो।।