इतकं सोपं आहे का ????
अहो का माझ्यावर असा अन्याय करता…. तुम्हाला जर मी नको असेल तर मला सोडून द्या, मला एखाद्या अनाथाश्रमात सोडून या,, पण माझा असा जीव घेऊ नका हो .… मला खरच जगायचंय… इतकं सोपं वाटतं का हो मला मारणं…. ???
इवल्याश्या नाजूक रंगीबेरंगी फुलपाखराला चिरडणं इतकं सोपं आहे का? त्याचे ते रंग, ती छटा तुम्हाला मोहून टाकत नाहीत का? कसं जमतं त्याला चिरडणं ?? पण ते निदान त्याच्या जीवासाठी सैरभैर होऊन उडू तरी शकतं…. पण मला, मला काही उलगडण्या आधीच तुम्ही मला चिरडून टाकता…. माझ्या इवल्याश्या डोळ्यांना बघून तुम्हाला आनंद वाटत नाही का हो? इतकं सोपं वाटतं का तुम्हाला मला चिरडणं ??…
सुरमई चे तुकडे करण्या इतकं सोपं आहे का मला मारणं ?? त्याची ती होणारी तळमळ तुम्हाला उघड्या डोळ्याने दिसू तरी शकते…. पण मला घर्भातच तुम्ही कापून टाकता, मारून टाकता…. माझी तळमळ कशी दिसणार तुम्हाला?? इतकं सोपं आहे का मला मारणं ??
कांदा चिरताना ही तुमच्या डोळ्यात पाणी येतं… मग माझे तर जिवंत काळीज..... त्याला चिरणं इतकं सोपं आहे का ???
बागेतील फुलं तुम्हाला मंद सुगंध देतात ना, मनाला उल्लासित करतात ना…. मग त्या कळीचे फूल होण्याआधी त्याला कुसकरणं इतकं सोपं आहे का?? मला ही फुलायचं…. तुमच्या मनाला आनंदित करायचं…. तुमच्याच आयुष्यात आनंद भरायचाय … मग तरी का झाली मी नकोशी???
उंच झोका घेताना मिळणारा आनंद कधी मला ही मिळू द्या …. इंद्रधनुच्या रंगीत छटा मला ही बघू द्या ….. निळेभोर आकाश, दुधा सारखा कोसळणारा धबधबा मला ही पाहू द्या…. बोबडे माझे स्वर कधीतरी कानावर येऊ द्या… घरभर रांगण्याचा आनंद कधीतरी मला ही घेऊ द्या… भिरभिरत्या पाखरां सारखं मला ही स्वच्छंदी उडू द्या…. खेळता खेळता चिखलात कधी मला ही पडू द्या…. खडू-पाटीची सोबत कधी मला ही मिळू द्या … रुसून कोपऱ्यात बसून कधी मला ही रडू द्या…. कान्यादानेचं महापुण्य तुमच्या पदरात घेऊन कधी मला ही सासरी जाऊ द्या.…........
कधीतरी म्हणा ना ही नकोशी नाही, ही तर आहे हवीहवीशी… नका करू माझी हत्या, मला ही जगू द्या …. मला ही जगू द्या.....

छान!😃👍
ReplyDelete