Monday, May 11, 2020

पोटल्याचा डोंगर आणि रायगडावरचा शेवटचा रणसंग्राम !

..
..........  आणि मी, म्हणजेच दुर्गदुर्गेश्वर, महाराजांच्या पावन स्पर्शाने गगनभरारी घेणारा मी, श्री रायगड, होरपळून गेलो..... तो दिवस म्हणजे 10 मे 1818....

आजवर मी अनेक सुख दुःखाचे क्षण अनुभवले होते.. पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणून नाम कमविले होते.. भर पौर्णिमेच्या रात्री चंद्रप्रकाशात न्हाऊन निघालेलो होतो, अमावस्येच्या काळोख्यात संग्रामात ऐतदारपणे झगडलो होतो.. ज्वालारसातून जन्मीलो होतो, एखाद्या बलदंड योद्ध्यासारखा बुलंदपणे उभा होतो.. 1662 साली रायरीचा श्री रायगड झालो होतो.. एका दशकानंतर स्वराज्याची राजधानी झालो होतो... 2 वर्षांनी स्वराज्य संस्थापक माझा पुत्र, ह्याचा राज्याभिषेक आनंदोत्सव बघितला होता, आणि तो दुःखद दिवसही अनुभवला होता जेव्हा काळाने 1680 साली घात केला होता.. माझ्या पोराला नेऊन मलाच पोरकं केलं होतं, माझा प्राण माझ्यापासून हिरावला होता..

आणि अखेर तो ही दिवस आला, अनेक वर्षे बुलंदपणे उभा राहिलेलो मी बऱ्याच प्रमाणात राखेत विरघळून गेलो..
इतिहासात आपण सर्वानी फितुरीची बरीच उदाहरणे पाहिली असतील. कोणी वतनासाठी, कोणी जहागिरदारीसाठी तर कोणी मोहरांसाठी फितूर झाले. अशीच एक फितुरी पोटल्याच्या डोंगराने देखील माझ्याबरोबर केली, पण त्यामागे काय कारण होते हे मात्र त्यालाच ठाऊक कि त्याचा नाईलाज होता. माझ्या दक्षिणेला असलेला पोटल्याचा डोंगर... कोणासाठी असशील अपराधी तू, कोणासाठी फिरंगी फितूर, पण माझ्यासाठी एक जिवलग सखाच जो दुरावूनही जवळ राहणारा...

इंग्रजांनी १ मे १८१८ या दिवशी माझ्यावर हल्ला चढवला..
कॅप्टन प्रॉथर हा नेतृत्व करीत होता. या वेळी माझा किल्लेदार होता अबुल फतेखान. आपलं सारं बळ एकवटून तो आपला भगवा झेंडा सांभाळत होता. माझी लेकरं, मराठे, इंग्रजांना इरेसरीने टक्कर देत होते. 6 मे 1818 रोजी दुसऱ्या बाजीरावाची पत्नी वाराणसीबाई हिने इंग्रजांसमोर तहाचे निशान फडकावले असतानाही कर्नल प्रॉथर व मेजर हॉल यांनी पोटल्याच्या डोंगरावरुन 10 मे 1818 पर्यंत तोफांचा भडिमार करुन माझ्या सर्व वास्तू अगदी बेचिराख करून टाकल्या व जमीनदोस्त केल्या. इंग्रजांची तोफाबंदुकांची आग, दारूगोळ्याचा प्रचंड स्फोट, मस्तकी वरून सूर्याची उन्हाळी आग, सगळीकडे आगच आग.
माझं, रायगड पाडावाचे वर्णन खुद्द प्रॉथर यानेच लिहून ठेवले आहे. तो म्हणतो, "मी जेव्हा रायगड ताब्यात घेण्यासाठी गडावर गेलो तेव्हा गोलकांच्या वर्षावाने भस्मसात झालेल्या इमारतीच्या फुफाट्याशेजारी ती (वाराणसीबाई) बसली होती. तिचे राहते घर धुमसत होते. पडवीवजा भागात आता तिचे वास्तव्य होते." कॅ. प्रॉथर वाराणसीबाईसाहेबांशी अदबीने आणि आदराने वागला. त्याने त्यांना मेण्यातून सन्मानपूर्वक पुण्याकडे रवाना केले. ब्रह्माावर्त येथे स्थानबद्ध असलेल्या श्रीमंत दुसऱ्या बाजीराव पेशव्यांकडे नंतर वाराणसीबाईंची इंग्रजांनी रवानगी केली..

माझ्या उदरी उरली फक्त राख. सारे वाडे , राजसभा आणि होतं नव्हतं ते जळण्यासारखं सारं जळून गेलं. सर्वात धडाडून जळालं माझं रक्षण करण्याकरता दहा दिवस झुंजलेल्या अबुल फतेखानचं आणि मराठी सैनिकांचं काळीज. आणि मी, म्हणजेच दुर्गदुर्गेश्वर, महाराजांच्या पावन स्पर्शाने गगनभरारी घेणारा मी, श्री रायगड, होरपळून गेलो.....
हिरकणी बुरुज, नगारखाना, पालखी दरवाजा, वाघ दरवाजा, जगदीश्वर मंदिर, नाना दरवाजा, टकमक टोक, माझ्या साऱ्याच अंगांनी इतिहास अनुभवला होता आणि ह्याक्षणी तो डोळ्यापुढे तरळत होता, पण माझे अश्रू कमी पडले, ह्या आगीला विझविण्यासाठी ते कमी पडले..
त्याक्षणी मला आठवले #कविराज #भूषण ह्यांनी माझ्या सौंदर्याला पाहून केलेले वर्णन...

 *दच्छिन के सब दुग्ग जिति दुग्ग सहार विलास।
सिवसेवक सिव गढपती कियो रायगड वास।।
जापर साहि तने सिवराज सुरेस की ऐसी सभा सुभ साजे।
यों कबिभूषन जंपत हे लखि संपति को अलकापति लाजे।।
जी मधि तिनहू लोक की दीपति ऐसी बडो गढराज विराजे।
वारि पताल सी माची मही अमरावति की छबी उपर छाजे।।
मनिमय महल सिवराज के इमि रायगड में राजही।
लखि जच्छ किन्नर असुर सुर गंधर्व हांसनि साजही।।*

अर्थ- ((..... शिवरायांनी सर्व किल्ल्यांचा आधार व विलासस्थान अशा रायगड किल्यास आपले वसतिस्थान केले. या किल्ल्यावरील शिवाजीचा दरबार व तेथील ऐश्वर्य पाहून कुबेर लाजू लागला हा. किल्ला एवढा प्रचंड आणि विशाल आहे, की त्यात तीनही लोकींचे वैभव साठविले आहे. किल्ल्याखाली भूभाग जलमय पाताळाप्रमाणे, माची म्हणजे पायथ्याचा उंचवट्याचा भाग पृथ्वीप्रमाणे व वरील प्रदेश इंद्रपुरीप्रमाणे शोभतो. रायगडावर शिवरायांचे रत्नखचित महाल शोभत आहेत.
रायगडावरील शिवरायांचे रत्नखचित महाल असे शोभत आहेत की त्यास पाहून यक्ष, किन्नर, सुर, असुर, गंधर्व हेदेखील ईर्षेने तसे महाल बनवू लागले..))

कविराज भूषणह्यांचे शब्द तरळत होते, मनोमनी अश्रू कोसळले.. पण पुन्हा एकदा दुर्गदुर्गेश्वर म्हणून मी उभा राहिलो... माझ्या लेकराचा, महाराजांचा, स्वराज्याचा सारथी म्हणून, इतिहास जपण्यासाठी, अभंग, निश्चल, स्वतंत्र उभा राहण्यासाठी.. माझे व इतर सह्यकडांचे भूषण गौरवशाली इतिहास माझ्या इतर लेकरांपर्यंत, तुमच्यासारख्या शिवभक्तांपर्यंत पोहचवण्यासाठी.. सक्षम..मी दुरदुर्गेश्वर, पूर्वेकडील जिब्राल्टर, श्रीमत किल्ले रायगड!!

जय शिवराय🙏🚩🚩
#दुर्गराष्ट्रसेवा हीच #शिवआज्ञा🚩
https://m.facebook.com/story.php?story_fbid=2655443421407324&id=2317767855174884

नम्रता खैरे

संदर्भ:
*राजधानी रायगड, महाराष्ट्र शासन पुस्तिका
*आजवर वाचण्यात आलेली पुस्तकं, लेख
*इंटरनेट

छायाचित्र: पोटल्याचा डोंगर
#पोटल्याचा_डोंगर #रायगड #इंग्रज #10मे1818 #शिवाजीमहाराज

No comments:

Post a Comment