कालच समजलं मानसिंग दादाने रात्री पत्र उशीजवळ ठेवलेलं आणि भर रात्री ते पत्र उंबरठ्या बाहेर पडलं. कदाचित आठवणींत गुंतलेलं, म्हणूनच अक्षरांना, वाक्यांना दुःख समजलं, ते गहिवरलं आणि ते निघालं......
निरव शांतता, भयाण वाटणारा काळोख असला तरीही रात्री एकटंच, आपली वाट शोधत, मजकूर योग्य त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवायला, एकटंच निघालं की....
आणि जे नेहमी घडतं तेच घडलं. आपण निघतो काम फत्ते करण्याच्या उद्देशाने पण कोणाला माहीत असतं नियतीने काय वाढून ठेवलंय पुढे.. सुख, दुःख, अनुभव, अनेक समस्या, अनेक परीक्षा ह्या जणू कमरेवर हात ठेवून तयारीनिशी पुढे उभ्या असतात.. पण ह्यावर मात केली, निभावलो तर सुख, नावलौकिक, गगनात न मावणारा असा आनंद.... पण हरलो, खचलो तर दुःखाचा डोंगर, डळमळीत आत्मविश्वास, आणि भूतकाळाच्या दलदलीत स्वतःला कोसत अगदी फसणं.... नियती परीक्षा ही पाहणारच, पण खचून न जाता त्यातून शिकणं, शहाणं होणं महत्वाचं....
पत्राला अडचणी आल्या तसं काहीसं आपलं पण होतं ना.. आपल्याला पण अनेक अडचणी येतात। कधी घातक मित्ररूपी दवबिंदू त्यांचा शिडकावा करतात तर कधी आपले अस्तित्व मिटवण्यासाठी वादळ रुपी लोक भेटतात जे चुकीचा सल्ला देतात, दिशाहीन करतात। पण कधी अक्षरांना सूर्यप्रकाश दिसला तसा आपल्याला ही चांगले जिवलग मित्र, लोक भेटतात, जे रक्ताच्या नात्याही पलीकडे असतात. जणू आशेचा किरण दाखवत....
थंडी, दवबिंदू पासून बचाव करण्यासाठी पत्राच्या घरच्यांनी गोलाकार उकारांनी, वेलांट्यानी आधार द्यायचा प्रयत्न केला, पण कितीकाळ? त्यांनाही एकाक्षणी साथ सोडावी लागते.... आपलं पण असंच होतं...
कधी कोणी जिवलग साथ सोडून जातो तर कधी कोणी जिवलग साथ सोडून देतो.......
आयुष्य हे जणू रंगमंच, प्रत्येकाची आपली एक भूमिका, ती पार पडली की निघणं भाग आहे.. पण नाटक संपेपर्यंत पडदा पडे पर्यंत, आपली भूमिका आपल्याला निभवावी लागते, आणि पुन्हा निघावं लागतं पत्रासारखच, राहिला तो मजकूर पोहचवण्यासाठी , एकटंच, आपल्या स्वत्वाच्या प्रवासासाठी, येणाऱ्या अडचणींवर मात करत, अनुभव पदरात घेत, शिकत.. सारं एकटंच.......
With reference to-
https://m.facebook.com/story.php?story_fbid=1421601837925078&id=100002258272620
---- Namrata Khaire

No comments:
Post a Comment